23.1 C
New York
Thursday, July 23, 2026

Buy now

spot_img

वारकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला! विशाल जोशी यांच्या पाठपुराव्याला यश; ‘वारकऱ्यांनी हात केला की एस.टी. थांबलीच पाहिजे’ – राज्य परिवहन विभागाचे स्पष्ट आदेश*

*वारकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला!
विशाल जोशी यांच्या पाठपुराव्याला यश; ‘

ढोरेगाव प्रतिनिधी :आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या प्रवासातील गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील विशाल जोशी यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे ई-मेलद्वारे केलेल्या जनहिताच्या निवेदनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य परिवहन विभागाने या निवेदनाची गंभीर दखल घेत पंढरपूर मार्गावरील सर्व एस.टी. चालक व वाहकांना वारकऱ्यांनी हात दिलेल्या ठिकाणी, प्रवासी क्षमतेनुसार बस थांबविण्याच्या तसेच परतीच्या प्रवासातही भाविकांच्या सोयीनुसार बस थांबविण्याच्या सक्त सूचना देण्याचे आदेश विभागीय पातळीवर जारी केले आहेत.
ही बाब राज्यभरातील लाखो वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानली जात असून, जनसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठविल्याने हा महत्त्वपूर्ण विजय ठरत आहे.
निवेदनात विशाल जोशी यांनी नमूद केले होते की, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होतात. ग्रामीण भाग, लहान गावे तसेच महामार्गालगत अनेक ठिकाणी वारकरी एस.टी.ची प्रतीक्षा करत असतात. मात्र बसमध्ये जागा उपलब्ध असतानाही अनेक बस न थांबता पुढे जात असल्याने वृद्ध, महिला, दिव्यांग, लहान मुले आणि आजारी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
परतीच्या प्रवासातही “येथे अधिकृत बसथांबा नाही” असे कारण देत अनेक वारकऱ्यांना गावापासून दूर किंवा निर्जन ठिकाणी उतरवले जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.
या निवेदनाची तातडीने दखल घेत राज्य परिवहन विभागाने विभाग नियंत्रक,सर्व राज्य परिवहन मंडाळाने स्वाक्षरीने संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पंढरपूर मार्गावर कर्तव्य बजावणाऱ्या सर्व चालक-वाहकांना मार्गावरील सर्व थांब्यांवर तसेच आवश्यक त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या चढ-उतारासाठी बस थांबविण्याबाबत सक्त सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच या संदर्भात कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
विशाल जोशी यांनी आपल्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, तसेच आमदार प्रशांत बंब यांनाही पाठविली होती. यासंदर्भात आमदार प्रशांत बंब यांनीही संबंधित विभागात पत्र दिले होते.या पाठपुराव्यानंतर शासन स्तरावर तातडीने हालचाली झाल्याने वारकरी वर्तुळातून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्य परिवहन महामंडळ ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून वारीसारख्या धार्मिक सोहळ्यात वारकऱ्यांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ प्रवास उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मतही जोशी यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या जनहिताच्या भूमिकेला अखेर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने वारकरी सेवेचा एक आदर्श निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, प्रवासातील गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुचना काय? आदेशातील महत्त्वाचे मुद्दे
वारकऱ्यांनी हात दिलेल्या ठिकाणी, बसमध्ये जागा असल्यास एस.टी. थांबवावी.
परतीच्या प्रवासातही भाविकांच्या सोयीनुसार बस थांबविण्याचे निर्देश.
चालक-वाहकांना स्पष्ट आणि सक्त सूचना देण्याचे आदेश.
वारकऱ्यांच्या तक्रारी होणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश

प्रतिक्रिया

*(परिवहन मंत्र्याचे व एसटी महामंडळाचे मनापासून आभार परंतु सर्व चालक वाहकांनी सहकार्य करून कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची काळजी घेऊन काम करावे जर सर्वसामान्य नागरिकाला वाहक किंवा चालकाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर तात्काळ गाडीचा नंबर घेऊन संबंधित विभाग किंवा ओनलाईन तक्रार करावी.*विशाल जोशी)*

Related Articles

ताज्या बातम्या