21.3 C
New York
Saturday, July 25, 2026

Buy now

spot_img

आषाढी एकादशीनिमित्त आर्ले हेल्थकेअरचा सेवाभावी उपक्रम* *मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १२४ रुग्णांची तपासणी, ४० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पुण्याकडे रवाना

*आषाढी एकादशीनिमित्त आर्ले हेल्थकेअरचा सेवाभावी उपक्रम

प्रतिनिधी | कुकाणा | दि. २५ जुलै :

ग्रामीण भागातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर्जेदार नेत्रोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आर्ले हेल्थकेअर, कुकाणा व इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल (के.के.आय. इन्स्टिट्यूट), कोरेगाव पार्क, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. २५ जुलै) रोजी कुकाणा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास कुकाणा व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरामध्ये एकूण १२४ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतीबिंदूचे निदान झालेल्या ४० रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क, पुणे येथे पाठविण्यात आले. या रुग्णांच्या शस्त्रक्रिया, आवश्यक वैद्यकीय उपचार तसेच इतर सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


शिबिरात के.के.आय. इन्स्टिट्यूट च्या मनीषा कोरडे,मिरा पटारे व अजय झिरपे यांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांच्या सेवेमुळे अनेक रुग्णांना वेळेत निदान व उपचाराची संधी उपलब्ध झाली.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शिबिरासाठी आलेल्या सर्व लाभार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. आरोग्यसेवेसोबत सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
आर्ले हेल्थकेअर, कुकाणा हे सन २००६ पासून सातत्याने मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत असून, गेल्या दोन दशकांपासून हजारो गरजू रुग्णांना उपचाराचा लाभ मिळवून देण्याचे उल्लेखनीय कार्य संस्था करत आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या संस्थेच्या कार्यामुळे परिसरात आर्ले हेल्थकेअरने विश्वासार्ह आरोग्यसेवा केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख, आर्ले हेल्थकेअरचे प्रमुख डॉ. गणेश आर्ले पाटील, पत्रकार नामदेव शिंदे, सोमनाथ कचरे, भागवत खराडे, मकरंद राजाहंस, जावेद शेख, कृष्णा कोलते, तसेच आर्ले पाटील पतसंस्थेचे व्यवस्थापक नितीन मेहत्रे, मनोज चोखर, वैष्णवी सोनवणे आणि पतसंस्थेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अब्दुलभैय्या शेख म्हणाले की, “आर्ले हेल्थकेअर ही संस्था समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे. सेवाभावी वृत्ती जपत ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे अनेक कुटुंबांना नवजीवन मिळत असून संस्था समाजासमोर आदर्श निर्माण करत आहे.” त्यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ कचरे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच उपस्थित नागरिकांचे डॉ. गणेश आर्ले पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आर्ले हेल्थकेअरचा हा सेवाभावी उपक्रम समाजोपयोगी ठरत असून, अशा आरोग्य शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

ताज्या बातम्या