21.3 C
New York
Sunday, June 28, 2026

Buy now

spot_img

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात*

 

दै.नगरशाही कुकाणा प्रतिनिधी –

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कुकाणा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. लता अभंग यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी नागरिकांनी आपल्या लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजून मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच एकनाथराव कावरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर, डॉ. कैलास कानडे, डॉ. संध्या करडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील गोर्डे, पत्रकार सोमनाथ कचरे व अनिल गर्जे उपस्थित होते.
कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १७ गावांमध्ये २५ लसीकरण बूथ उभारण्यात आले असून, एकूण ५९ हजार ६१७ लोकसंख्येच्या क्षेत्रात १ ते ५ वर्षे वयोगटातील ४ हजार ४१२ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व बूथवर लसीकरण करण्यात येत असून, लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नवजात बालकांनाही ही लस देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कैलास कानडे म्हणाले की, “पोलिओ हा अत्यंत गंभीर आजार असला तरी वेळेवर लसीकरण केल्यास तो पूर्णपणे टाळता येतो. प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. भारताने पोलिओमुक्त देशाचा मान मिळविला असला तरी जगातील काही भागांत अजूनही पोलिओची प्रकरणे आढळतात. त्यामुळे सतर्कता कायम ठेवणे आणि प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले की, पोलिओ हा विषाणूजन्य संसर्ग असून तो प्रामुख्याने पाच वर्षांखालील बालकांना बाधित करतो. या आजारामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते. मात्र, प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत नियमितपणे पोलिओचे दोन थेंब दिल्यास या आजारापासून प्रभावी संरक्षण मिळते. त्यामुळे कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू देऊ नये.
यावेळी पत्रकार सोमनाथ कचरे यांनी शासनाच्या या जनहिताच्या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, “भविष्यात देशात पुन्हा पोलिओचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासन सातत्याने ही मोहीम प्रभावीपणे राबवत आहे. जनजागृती करून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लस पोहोचविण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी आरोग्य निरीक्षक धर्मनाथ पालवे, अनिल पचारणे, संदीप थोरात, नलिनी साबळे, वैशाली बनसोडे, नीता पोपळघट, विशाल गायकवाड, भीमराज लवांडे, साक्षात सारवान तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या