विजय श्रीवास्तव यांचा गौरव
विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि मूल्याधारित कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल
पुणे, प्रतिनिधी ता. : मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा, भैरवनगर, धानोरी (पुणे-१५) येथील मुख्याध्यापक श्री. विजय रूपलाल श्रीवास्तव यांना शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, मूल्याधारित शिक्षणाचा प्रसार आणि प्रभावी शैक्षणिक नेतृत्व यांची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभात मुजावर, भाजप महिला अध्यक्षा सौ. अमृता देगावकर, व्यावसायिक श्री. बाबासाहेब दिघे, येवले उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. नवनाथ येवले तसेच स्विफ्ट अँड लिफ्टचे प्रमुख श्री. निलेश साबे यांच्या शुभहस्ते श्री. श्रीवास्तव यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
श्री. विजय श्रीवास्तव यांनी मुख्याध्यापक म्हणून शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देत विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि आधुनिक शिक्षण पद्धतींचा प्रभावी वापर यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्री. विजय श्रीवास्तव म्हणाले, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि संस्थेच्या विश्वास व सहकार्याचा गौरव आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम आणि आधुनिक शिक्षण देण्यासाठी भविष्यातही अधिक जोमाने कार्य करत समाजोपयोगी शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा माझा प्रयत्न कायम राहील.”
या सन्मानाबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. विजय श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना हा पुरस्कार संपूर्ण शाळेसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
ठळक बाबी
‘राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ ने गौरव.
विद्यार्थीकेंद्रित व मूल्याधारित शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर सन्मान.
नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्तावृद्धीची दखल.
शाळेच्या सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याचे यश असल्याची श्रीवास्तव यांची भावना.
फोटो कॅप्शन : ‘राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ स्वीकारताना मुख्याध्यापक श्री. विजय रूपलाल श्रीवास्तव. समवेत पुरस्कार प्रदान करणारे मान्यवर.










