29.3 C
New York
Monday, July 13, 2026

Buy now

spot_img

शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे-पाटील यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त त्रिमूर्तीच्या ढोरजळगाव संकुलात भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न; २०० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी, ४१ जणांचे रक्तदान*

*शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे-पाटील यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त त्रिमूर्तीच्या ढोरजळगाव संकुलात भव्य रक्तदान व मोफत  आरोग्य तपासणी करून आदरांजली

ढोरजळगाव-ने (प्रतिनिधी) : शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल, ढोरजळगाव-ने व जनकल्याण रक्तपेढी, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत संकुलाच्या प्रांगणात भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. शिबिरात २०० हून अधिक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर ४१ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली.

शिक्षण, समाजसेवा आणि आरोग्यसेवा यांचा समन्वय साधणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करणे, गरजू रुग्णांसाठी सुरक्षित रक्ताचा साठा उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा होता. परिसरातील नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा.श्री.बापूसाहेब पा. पाटेकर हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संकुलाचे मुख्य प्रशासक श्री.सचिन कर्डिले सर यांनी प्रास्ताविकातून शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे-पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.

शिक्षणासोबत समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत अशा लोकहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची संकुलाची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सर्व मान्यवरांचे हस्ते संकुलात रुक्षारोपण करण्यात आले.

यावेळी डॉ. गौरव आमले यांनी रक्तदानाचे महत्त्व, नियमित आरोग्य तपासणीची आवश्यकता तसेच निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याबाबत मार्गदर्शन केले. रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. बापूसाहेब पा. पाटेकर यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे-पाटील यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि सेवाभावी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शिक्षणाबरोबरच समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत असून रक्तदान व आरोग्य तपासणीसारखे उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक निरोगी नागरिकाने रक्तदानाचा संकल्प करावा तसेच आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

माजी सरपंच युवा नेतृत्व श्री. गणेश कराड यांनी आपल्या मनोगतातून साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमास त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड.सुमतीताई साहेबराव घाडगे-पाटील, उपाध्यक्षा ॲड.स्नेहल चव्हाण-घाडगेपाटील, डॉ. अनुराधा गोरे, सौ. जयश्री भवर मॅडम यांनी आरोग्य शिबिरास सदिच्छा भेट दिली, माजी सरपंच श्री. गणेश कराड,श्री.महादेव पाटेकर, श्री.सुरेश पाटेकर साहेब, डॉ.विश्वास जायभाये श्री.आकाश साबळे, माजी सरपंच श्री.एकनाथ कराड, श्री.सुखदेव उकिर्डे, माजी सरपंच सौ.गौरीताई अनंता उकिर्डे, सौ.अश्विनी अभय कराड तसेच तेलकूडगाव चे सरपंच श्री. सुतीशराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरात मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब (बी.पी.), रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली. याशिवाय गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. विविध आजारांचे लवकर निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व आवश्यक वैद्यकीय सल्ला मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या शिबिरात डॉ. गौरव आमले (मेंदूविकार तज्ज्ञ), डॉ. संतोष गिते (मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. अशोक शिंदे (जनरल पोटविकार तज्ज्ञ), डॉ. गणेश गिते (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ. विजश्री गिते (नेत्रतज्ज्ञ), डॉ. तेजश्री जुनगडे (कर्करोग तज्ज्ञ), डॉ. विकास बेडके, डॉ. देविदास देशमुख तसेच डॉ. प्रशांत बुधवंत यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.

रक्तदान शिबिरात ४१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून संकलित झालेले रक्त अपघातग्रस्त, थॅलेसेमिया, कर्करोग तसेच विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच २०० हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक वैद्यकीय सल्ला घेतला.

या समाजोपयोगी उपक्रमासाठी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड.सुमतीताई साहेबराव घाडगे-पाटील, उपाध्यक्षा ॲड.स्नेहल चव्हाण-घाडगेपाटील, विश्वस्त श्री.चेतन चव्हाण पाटील,सहसचिव डॉ.श्रुतीताई आमले- घाडगे पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गौरव आमले पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. आशिष भारती, पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. संजय बुधवंत,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.संदीप घोडेचोर,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद भोईटे तसेच डी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रदीप नवल व सर्वच स्टाफ यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकुलातील सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,अधिक्षक, प्रशिक्षक, सिव्हिल कर्मचारी,स्वयंसेवक तसेच जनकल्याण रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदरील कार्यक्रमात कु.गिरीजा देविदास देशमुख हिची इस्रो सहलीसाठी बंगलोर या ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्रिमूर्ती संकुलाच्या वतीने तसेच साई माऊली हॉस्पिटलच्या वतीने डॉ. गिते यांनी तिचा व पालकाचा सन्मान केला.
श्री.आकाश मिसाळ यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Related Articles

ताज्या बातम्या