19.7 C
New York
Friday, May 29, 2026

Buy now

spot_img

एकल महिलांसाठी होणार स्वतंत्र धोरण एकल महिलांसह कार्यकर्त्यांत समाधान

दै.नगरशाही भेंडा –  वृत्तसेवा
सर्वच एकल महिलांसाठी राज्य शासन स्वतंत्र धोरण ठरविणार आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मसुदा धोरण समितीमध्ये एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांचा समावेश असल्याने राज्यभरातील एकल महिलांसह सर्व कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


एकल महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र धोरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे .महिला बालकल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी असून साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांचाही समावेश आहे.त्यामुळे साऊ एकल महिला समितीचे मिशन वात्सल्य राज्य समन्वयक कारभारी गरड, नेवासा तालुका समन्वयक रेणुका चौधरी,भारत आरगडे, आप्पासाहेब वाबळे, येडूभाऊ सोनवणे, डॉ.रजनीकांत पुंड आदींनी या निर्णयाबद्दल सरकारचे मनापासुन स्वागत केले
आहे.


राज्यात एकल महिलांची प्रचंड संख्या असल्याने स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती.२०११ मध्ये महाराष्ट्रात एकल महिलांची संख्या ५४ लाख होती ,ती १५ वर्षानंतर किमान ७० होईल. त्यामुळे या महिलांचे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक ग्रामीण शहरी असे सर्व प्रश्न बघता धोरणाची गरज असल्याने साऊ एकल महिला राज्य समितीने आग्रही मागणी केली होती .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात एकल महिलांसाठी लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल,अशी घोषणा केली होती.त्या घोषणेच्या अंमलबजावणीची साऊ एकल महिला समितीने आग्रही पाठपुरावा केल्यावर मुख्यमंत्र्यंचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी एकल महिला प्रश्नावर दोन बैठका घेऊन मसुदा समिती स्थापन करण्याचे महिला बालकल्याण विभागाला सूचित केले.महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यानीही त्यानंतर एकल महिला धोरण विषयावर चर्चा करण्यासाठी बैठका घेऊन समिती स्थापन केली.
राज्यात असलेल्या सर्व शासकीय विभाग, अधिकारी,लोकप्रतिनिधी
व या महिला प्रश्नावर काम करत असलेल्या सर्व संस्था,संघटना यांच्याशी ही समिती चर्चा करेल व विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण, बदल,नवीन प्रस्ताव करून राज्याचे धोरण होईल.
या धोरणामुळे एकल महिलांच्या प्रश्नावर सर्व शासकीय विभाग संवेदनशील होतील व शासन आणि समाजासाठी या महिलांचे प्रश्न महत्वाचे ठरतील.एकल महिला यांच्या अपेक्षा आणि भावना याचे प्रतिबिंब नक्कीच या धोरणात असेल,अशी एकल महिलांची अपेक्षा आहे.

Related Articles

ताज्या बातम्या