-14.9 C
New York
Sunday, February 8, 2026

Buy now

spot_img

साईज्योती सरस २०२६ : कृषीपूरक व महिला सक्षमीकरणाला चालना देणारा उपक्रम*जिल्हाधिकारी पंकज आशिया

दै.नगरशाही प्रतिनिधी/परविन शेख –
अहिल्यानगर जिल्हा परिषद व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “साईज्योती सरस २०२६” या उपक्रमाचे उद्घाटन आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच कृषीपूरक उद्योगांना चालना देणारा हा उपक्रम असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले.
या उद्घाटन समारंभास मा. श्री. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंधारण तथा पालकमंत्री, अहिल्यानगर, मा. आ. श्री. संग्राम भैय्या जगताप, मा. श्री. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर, मा. श्री. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर, मा. श्री. सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर तसेच मा. श्रीम. मंजुषा ठवकर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अहिल्यानगर यांची उपस्थिती लाभली.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, “उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना उद्योगाची संधी मिळत असून कृषीपूरक प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन व स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम होत आहे. महिलांनी तयार केलेली उत्पादने दर्जेदार असून त्यांना शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”


जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “उमेद व कृषी विभागाच्या समन्वयातून महिलांचे उत्पादनक्षम गट निर्माण होत असून अशा प्रदर्शनांमुळे महिला बचत गटांचा आत्मविश्वास वाढतो. स्थानिक उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रभावी मंच आहे.”
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले की, “उमेद अंतर्गत महिलांना केवळ बचतीपुरते मर्यादित न ठेवता उद्योग, विपणन व आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘साईज्योती सरस’ हा त्याचा उत्तम नमुना आहे.”
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी कृषीपूरक उद्योगांवर भर देताना सांगितले की, “शेतमाल प्रक्रिया, मसाले, खाद्यपदार्थ, जैविक व नैसर्गिक उत्पादनांच्या माध्यमातून महिलांना कृषी क्षेत्राशी जोडण्याची मोठी संधी आहे. अशा प्रदर्शनांमुळे कृषी व महिला उद्योग यांचा समन्वय साधला जात आहे.”
प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर यांनी उमेद अभियानाची माहिती देताना सांगितले की, “महिला बचत गटांनी तयार केलेले दर्जेदार खाद्यपदार्थ, हस्तकला व ग्रामीण उत्पादने बाजारात पोहोचविण्यासाठी ‘साईज्योती सरस’ हे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.”


या प्रदर्शनामध्ये खाद्यपदार्थ, मसाले, कृषीपूरक प्रक्रिया उत्पादने, ग्रामीण कलाकुसर, हस्तकला वस्तू तसेच महिलांनी स्वनिर्मित केलेली विविध उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
हे प्रदर्शन दि. ५ ते ९ फेब्रुवारी २०२६, दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत
नेमाणे इस्टेट, नगर–पुणे रोड, रेल्वे पुलाजवळ, केडगाव, अहिल्यानगर येथे भरविण्यात आले असून प्रवेश विनामूल्य आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेद महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या