- दै.नगरशाही भेंडे प्रतिनिधी –
सौंदाळा गावातील नागरिकांनी जाती – भेदभाव या गोष्टीला मुठमाती देऊन स्वातंत्र्य समता बंधुता अंगीकारण्यासाठी सौंदाळा ग्रामसभेत रक्तदान करून गाव मा. श्री प्रमोद झिंझाडे यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन “जातमुक्त गाव” घोषित केले अशी माहिती लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली.
देशात आणि महाराष्ट्रात जाती जाती मध्ये माणसं विखुरलेली असल्यामुळे गावोगावी जाती-जाती मधले होणारे ताण तणाव, शांतता भंग आणि विनाकारण जातीयते मुळे होणारे तणाव कमी व्हावे आणि मानव अधिकारांचे उल्लंघन होऊ नये हा मुख्य हेतू सदर ठराव घेण्याचा असल्याचे समजते.
भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवी प्रतिष्ठेचा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे. तरीही समाजात जातीय भेदभाव, अस्पृश्यता व सामाजिक विषमता आढळून येते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 अंतर्गत ग्रामसभेला गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी तसेच सार्वजनिक हिताच्या विषयांवर ठराव करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून ग्रामपातळीवर सामाजिक एकात्मता व समता प्रस्थापित करण्यासाठी आपले गाव “जातमुक्त गाव” म्हणून घोषित करणे अत्यंत आवश्यक आहे असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
त्यासाठी ग्रामसभेत बहुमताने पुढीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला.
सदर ग्रामसभेत निर्णय घेण्यात येतो की,
मौजे सौंदाळा गावामध्ये जात, पंथ, धर्म, वंश या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
गावातील सर्व नागरिक समान आहेत व “माझी जात – मानव” ही भावना स्वीकारण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सव इत्यादींमध्ये जातीभेद पूर्णपणे बंद राहील.
गावामध्ये कोणतीही जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता किंवा सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा/ग्रामपंचायत त्यावर तत्काळ कारवाई करेल.
सौंदाळा गाव “जातमुक्त गाव (Caste Free Village)” म्हणून घोषित करण्यात येत आहे.
हा ठराव शासनाकडे व संबंधित विभागांकडे नोंदवहीसाठी पाठविण्यात यावा.
ग्रामसभेतील सर्व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. सदर संकल्पना व प्रेरणा सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनातून प्राप्त झाली असून ग्रामसभा त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
वरील ठराव सुचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडला व अनुमोदन श्री बाबासाहेब बोधक यांनी दिले ठराव सर्वानुमते/एकमताने मंजूर करण्यात आला.
गावात कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव, अस्पृश्यता किंवा सामाजिक बहिष्कार केला जाणार नाही.
सर्व सार्वजनिक ठिकाणे (पाणीपुरवठा, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय इ.) सर्वांसाठी समान हक्काने खुली राहतील.
जातीय सलोखा, समता व बंधुता याबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतील.
गाव “जातमुक्त गाव” म्हणून अधिकृतपणे घोषित करून त्यासंदर्भातील फलक लावण्यात येईल.
गावातील कुणीही सोशल मिडियावर जाती भेदभाव बाबत मेसेज करणार नाही व कुणाला करुही देणार नाही.
शासनाच्या समता व सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सौं प्रतिभा पिसोटे.उपसरपंच भिवसेन गरड. गणेश आरगडे. हरिभाऊ आरगडे.बाळासाहेब बोधक. बाबासाहेब बोधक. अमीनभाई सय्यद. छगन सय्यद.सचिन अरगडे. कृष्णा चामुटे. गणेश महाराज आरगडे. हरीश बोधक. बाबासाहेब आरगडे.भारत तारकस. सोमनाथ आरगडे. बाळासाहेब आरगडे.श्रद्धा आरगडे. राणी आरगडे. मनीषा गरड. नंदा आढागळे. कावेरी आढागळे आदी उपस्थित होते










