सोनई प्रतिनिधी -संदिप दरंदले -शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेवासा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नेवासा येथे गुरुवारी भव्य प्रचारसभा होणार आहे.
माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांच्यावर ‘मातोश्री’चे विशेष प्रेम आणि जिव्हाळा आहे. शिवसेना पक्षफुटीच्या काळात अपक्ष असूनही आमदार शंकरराव गडाख यांनी ठाकरेनिष्ठा दाखवत फुटणाऱ्या आमदारांसोबत न जाता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मूळ शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या परिवाराने त्यांचा मातोश्री निवासस्थानी सन्मान करत तसेच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी खुद्द नेवाशात येऊन आमदार शंकराव गडाख यांनी दाखवलेल्या निष्ठेबद्दल कौतुक केले. तेव्हापासून आमदार शंकरराव गडाख यांच्यावर ठाकरे कुटुंबाचे विशेष प्रेम आहे. त्यामुळेच विधानसभा उमेदवारांच्या पहिल्याच यादीत आमदार गडाख यांचे नाव अग्रक्रमाने होते. कोणत्याही अमिषाला बळी न पडता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पक्षाबद्दल निष्ठा जपल्याबद्दल त्यांचे प्रचंड कौतुक झाले होते.
आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी वेळ दिली असून, गुरुवार (दि.१४) रोजी दुपारी १२ वाजता नेवासे फाटा मध्यवर्ती असलेल्या ज्ञानेश्वर महाविद्यालय समोरच्या नामदेव नगरच्या प्रांगणात सभा होणार आहे.-