*सहाय्यक कामगार आयक्तांना निवेदणाद्वारे मागणी*
नेवासा (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील कामगार विभागातील दलालांचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कामगार विभागाचे संभाजी माळवदे यांनी अहिल्यानगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे केली.
शासनाने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरु केल्या असून या योजनाच्या माध्यमातून कामगारांना विविध प्रकारचे लाभ देण्यात येतात. परंतु या योजनाचा लाभ मिळविण्याकरिता दलालाशिवाय पर्यायचं उरला नसल्याचे आढळून आले आहे. कामगारांच्या नोंदणीपासून ते विविध योजनाचा लाभ मिळेपर्यंत या दलालाच्या मध्यस्थीशिवाय पर्यायच उरला नाही.अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कामगाराना विविध प्रकारचे आमिष दाखवून या कामगारांची दलालाकडून मोठी लूट होत आहे. बांधकाम कामगार मंडळात नोंदणी केल्यानंतर विवाहासाठी, महिलांना प्रसूतीसाठी, मुलांच्या शिक्षणसाठी, पदवी व पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी, गंभीर आजाराच्या उपचारार्थ, नैसर्गिक मृत्यू झाल्यास, विधवा पत्नीस मानधन असे लाभ कामगारांना मिळतात. याशिवाय मध्यान्न भोजन, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, सुरक्षा विमा योजना, अशा योजनाचा लाभ कामगार मंडळाच्या माध्यमातून देण्यात येतो. याशिवाय कामगारांना कामाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपयोगी वस्तूंची किट दिली जाते.अशा योजना सरकारकडून राबविल्या जातात परंतु या योजनाची माहिती व प्रक्रिया कामगारांना माहिती नसल्याने दलाल याच गोष्टीचा फायदा घेतात जिल्ह्यात कामगारांना मिळणाऱ्या पेट्या मिळवून देण्यासाठी देखील अमाप पैसा या दलालानी लुटला.यात कर्मचारी, अधिकारी, यांचा देखील समावेश आहे. कामगारांना मिळणाऱ्या लाभातील अर्धाभाग हा दलाल लुटतात. जिल्ह्यातील अनेक दलालांनी अल्पवधीतच करोडो रुपयांची माया कमावली यात मोठया इमारती, चारचाकी वाहन, जमिनी, प्लॉट,असा ऐवज जमावला आहे. तर अनेक दलाल आमचा अधिकारी वर्गाशी कसा संबंध आहे हे पटवून आमच्या शिवाय तुमचे कामच होऊ शकत नाही, तुम्हाला योजनेचा लाभ मिळूच शकत नाही असे सांगून लूट करतात. तर फक्त नोंदणी साठी दोन ते तीन हजार रुपये व शिवाय पावत्याच्या नूतनीकरण करण्यासाठी दरवर्षी तेवढेच पैसे हे दलाल उकळतात. या सर्वाना आळा घालण्यात यावा व या दलालांच्या मुसक्या आवळल्या जाव्यात यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कामगार विभागाचे संभाजी माळवदे यांनी अहिल्यानगर येथे सहाय्यक कामगार आयुक्त यांची भेट घेऊन या दलालावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. व अहिल्यानगर जिल्ह्यातील कामगार विभागातील दलालाचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी केली.यावेळी नेवासा काँग्रेसचे अंजुम पटेल, बसपाचे हरीश चक्रनारायण, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे, गुलाब शेख, आदी उपस्थित होते.