दहावी-बारावी परीक्षा केंद्र अदला-बदलीचा निर्णय संवेदनशील केंद्राबाबत केंद्राध्यक्ष व पर्यवेक्षक अदलाबदल
———————————————
| विविध संघटनांच्या मागणीला यश |
———————————————- दै.नगरशाही
प्रतिनिधी: समीर शेख
फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या होणाऱ्या परीक्षेसाठी केंद्र संचालक व पर्यवेक्षक अदला- बदलीचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अचानक घेतला होता,या निर्णयामुळे परीक्षेच्या दरम्यान इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग भरवणे अवघड जाणार होते.महिला शिक्षकांना सकाळच्या सत्रात आपली मूळ शाळा करून सकाळी दहा वाजेपर्यंत एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात जाण्यासाठी जीकिरीचे होणार होते.
नवीन केंद्रावर केंद्र संचालकांना भौतिक सुविधा बद्दल माहिती नसल्याने अडचण निर्माण होणार होती तसेच परीक्षा कालावधीत अन्य वर्ग व शालेय कामकाज विस्कळीत होणार होते व परीक्षार्थी ही तणावात होते त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाला अनेक शिक्षक संघटनांनी निवेदन दिले होते.विविध लोकप्रतिनिधी, संस्थाचालक संघटना,मुख्याध्यापक महामंडळाच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्या- त्या विभागीय शिक्षण मंडळाकडे हा निर्णय मागे घेण्यासाठी पत्रव्यवहार करून दबाव निर्माण केलेला होता तसेच सर्वच सन्माननीय शिक्षक आमदारांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन केंद्र संचालक व पर्यवेक्षक बदलल्याने येणाऱ्या अडचणी बाबत सर्व संघटनांच्या वतीने चर्चा केली होती.या सर्व प्रयत्नांची दखल घेत शिक्षण सचिव यांच्या आदेशानुसार केंद्र संचालक व पर्यवेक्षक अदला बदलीचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून मागे घेण्यात आला.फक्त ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरणे घडली आहेत अशाच केंद्रावर अदलाबदल होणार आहे.काही प्रमाणात का असेना शासनाने आपल्या निर्णयात बदल केला व इयत्ता दहावी-बारावीच्या केंद्र संचालक व पर्यवेक्षक-शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गावर विश्वास दाखवला त्याबद्दल शासनाच्या सर्व प्रतिनिधी व मा.शिक्षणमंत्री महोदय यांचे विविध विद्यार्थी,शिक्षक, मुख्याध्यापक,संस्थाचालक संघटना व कृती समिती यांनी आभार मानले.
परीक्षा कालावधीत शिक्षणाधिकारी माध्यमिक ,सदस्य सचिव दक्षता समिती,विभागीय मंडळ यांनी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने प्रत्येक केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील,तसेच परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या भेटी होतील असे नियोजन करणे,ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्रमान्यता रद्द करणे,परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा सचिव राज्य मंडळ पुणे यांच्या आदेशानुसार देण्यात आली आहे.