4.3 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img

शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, वंचितांचे प्रश्न सोडविण्याची धमक आमदार गडाखांमध्येच ज्येष्ठ नेते मा.खा.यशवंतराव गडाख यांचे प्रतिपादन : महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न

दै.नगरशाही सोनई प्रतिनिधी (संदिप दरंदले )

– अत्यंत खालच्या राजकीय पातळीवर अडथळे उभे करुनही तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, वंचितांचे प्रश्न सोडविण्याची धमक आमदार शंकरराव गडाखांमध्येच असल्याचे प्रतिपादन माजी खासदार ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केले.
विधानसभा निवडणुकीसाठी नेवासाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केल्याच्या पार्शवभूमीवर प्रचार नियोजनासाठी सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार पांडुरंग अभंग, ऍड. देसाई आबा देशमुख, बहुजन नेते अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला.

 

यावेळी मेळाव्यास मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते गडाख पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनाच मातीत घालण्याचे पाप केले. मागील निवडणुकीत मी एकटा तुमच्या पाठीशी होतो, परंतु यंदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासारखे दिग्गज नेते तुमच्या पाठीशी असल्याने कुठलीही भीती राहिली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार गडाख यांना विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खूप त्रास देऊनही ते त्यांच्या भूमिकेवर भक्कम व ठाम राहिल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. तालुक्याचा मान सन्मान जागृत ठेवा, योग्य मार्गाने चालले आहात, या निवडणुकीत आपली ताकद दाखविण्याचे आवाहन गडाख यांनी यावेळी केले. विरोधकांकडून ज्याला तालुक्यातील गावे, कार्यकर्ते माहिती नाहीत अशा व्यक्तीला केवळ त्याची आर्थिक भक्कम पार्शवभूमी पाहून उमेदवारी लादण्याचे घाटत असल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधून विरोधकांच्या तालुक्यासाठीच्या राजकीय योगदानाचे मूल्यमापन करण्याचे आवाहन त्यांनी करून यावेळी आमदार गडाख मोठ्या मताधिक्यांनी विजयी होण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


यावेळी बोलताना आमदार गडाख यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मेळाव्यास दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडीचा आढावा घेताना, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुळा एज्युकेशन संस्थेची जागा ताब्यात घेण्यासाठी केंद्र व राज्यातील सत्तेचा गैरवापर, कुटुंबातील दुर्दैवी घटनेचे राजकीय भांडवल करून वैयक्तिक आरोपांचा पुनरूच्चार आमदार गडाख यांनी यावेळी केला.

सर्वात कमी खर्चात इथेनॉल प्रकल्प मुळा कारखान्याने उभारल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधून राज्यातील इतर कारखान्यांना मदत करणारे केंद्र व राज्य सरकार मुळा कारखान्याला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय द्वेशातून नाबार्ड कडून एक रुपयांचेही अर्थासाहाय्य मिळू देण्यात आले नसल्याची बाब निदर्शनास आणून देत केवळ वेळेत हिशोब दिला नाही म्हणून मुळा कारखान्याला आयकर विभागाची नोटीस बजावल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.


या राजकीय अन्यायाचा आपण खंबीरपणे मुकाबला करणार असल्याचे स्पष्ट करून समोर उमेदवार कोण राहील यांच्याकडे न पाहता निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यानीं यावेळी केले.

यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, ऍड. देसाई आबा देशमुख, बहुजन नेते अशोक गायकवाड, अमित रासने,राजेंद्र टेमक,भांगे महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे प्रास्ताविक नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सुभाष देवढे यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या