तेलकुडगाव येथे जयभीम पॅंथर व नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन टीम कडून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
प्रतिनिधी:समीर शेख
नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘जयभीम पॅंथर-एक संघर्ष ‘या नुकत्याच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपटाचे निर्माते भदंत शीलबोधी थेरो तसेच भंते करुणासागरजी समवेत या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील,निर्मितीप्रमुख संतोष गाडे, कलादिग्दर्शक प्रकाश शिनगारे आदी मान्यवरांनी नुकतीच अहिल्यानगर येथील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव मधील घाडगे पाटील शैक्षणिक संकुलाला भेट देत वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी शालेय व दैनंदिन उपयोगी साहित्याचे वाटप केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भदंत शीलबोधी थेरो म्हणाले की सम्राट अशोकाच्या सुवर्णकाळाचा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभलेला असून तोच सुवर्णकाळ आपल्याला पुन्हा आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, सर्वांना समान संधी व सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत ज्ञानार्जनाच्या कामाबरोबरच वडीलधाऱ्यांचा,गुरुजनांचा मान ठेवला पाहिजे तसेच मनुष्य समाजशील प्राणी आहे आपण प्रत्येक जण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ही भावना सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे व ज्याला जी शक्य होईल तितकी मदत समाजातल्या शेवटच्या घटकाला मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे.
याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने सर्व अतिथींचा येथोचित सन्मान विद्यालयाच्या प्रशासक मनीषा राऊत व प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे यांनी केला.यानंतर नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन च्या सर्व सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय व दैनंदिन उपयोगी साहित्याचे वाटप केले. या फिल्मचे निर्माते भदंत शीलबोधी थेरो हे वस्तीगृहातील विद्यार्थी ओम राऊत याचे मामा आहेत. सर्व विद्यार्थी आपलेच आहेत या भावनेतून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी भारवून गेले.
नवयानची टीम राज्यभर असे सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक भाऊ घाडगे यांनी सर्व टीमचे आभार मानले.