दै.नगरशाही
भेंडा प्रतिनिधी:
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांना मागील 9 महिन्यापासून बाल संगोपन निधी न मिळाल्याने नेवासा तालुका साऊ एकल महिला समितीच्या वतीने महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात एकल महिलांच्या समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा निधी सुमारे 9 महिन्यांपासून मिळालेला नाही. त्यामुळे महिलांच्याआर्थिक समस्येत भर पडलेली आहे मुलांना शालेय शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अनेक पालकांनी नवीन बालसंगोपन प्रस्ताव सादर करून दोन वर्षाचा कालावधी उलटला तरी लाभ सुरू झालेला नाही. वरील प्रकारात तातडीने सुधारणा होऊन लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्यास महिला व बालकांसह आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीने दिला आहे.
निवेदनाची प्रत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी यांना दिली असून निवेदनावर समितीचे तालुका समन्वयक कारभारी गरड ,रेणुका चौधरी , भारत आरगडे ,येडूभाऊ सोनवणे , एकल महिला क्रांती भालेराव,लंका मोटे, मीरा आढाव,सुजाता मस्के, स्वाती फाळके आदींसह इतर महिलांच्या सह्या आहेत.