*”फिर्यादीस सोने केले परत”*
*”नेवासा पोलिसांनी चोरीस गेलेले सोने केले परत”*
दै.नगरशाही
नेवासा प्रतिनिधी :- दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सौंदाळा येथे स्वप्नाली बाबासाहेब गरड यांचे राहते घरी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन जबरदस्तीने 339000/- रुपयांचे 7 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेले बाबत पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती.
सदर घटनेची पोलीस ठाणे नेवासा, पोलीस निरीक्षक, धनंजय अ. जाधव यांनी तातडीने गांभीर्याने नोंद घेऊन तपास पथके नेमून अनोळखी आरोपींचा शोध सुरू केला होता. याच दिवशी संभाजीनगर शहरामध्ये देखील अशाच प्रकारे घरफोडी झाली होती व त्यामधील अनोळखी चोर हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते याची माहिती नेवासा पोलिसांना मिळताच सदरचे सीसीटीव्ही फुटेज युद्ध पातळीवर प्राप्त करून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तसेच सदरचे सीसीटीव्ही फुटेज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांना देखील शेअर करून आरोपींची ओळख पटवली असता आरोपी हे अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न होवुन त्यांची नावे सचिन ईश्वर भोसले रा. बेलगाव ता. कर्जत व गाड्या उर्फ गाडेकर झरक्या चव्हाण रा. नागझरी ता. गेवराई जि. बीड येथील असलेले समजले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर येथील पथकाने सदरच्या आरोपींना अथक परिश्रमानंतर शिताफीने जेरबंद केले होते. सदर आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आणखी पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली होती.
नेवासा येथील गुन्ह्यात जे सोने जबरीने चोरून नेले होते ते परत मिळवण्यासाठी यातील फिर्यादी स्वप्नाली आरगडे यांनी नेवासा न्यायालयात विनंती अर्ज केला होता. मा. न्यायालयाने याबाबत नेवासा पोलिसांचे म्हणणे मागितले होता. नेवासा पोलिसांनी फिर्यादीस सोन्याचे दागिने परत करण्याबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्यानंतर फिर्यादीचे जबरीने चोरून नेलेले सोन्याचे दागिने फिर्यादीस परत करण्याचे आदेश माननीय न्यायालयाने दिले होते. त्या प्रमाणे सदरचे सोन्याचे दागिने आज रोजी फिर्यादी नामे स्वप्नाली आरगडे रा. सौंदाळा, ता. नेवासा यांना विधीवत त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे, या बाबत फिर्यादीने आनंद व्यक्त केला.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक ससाने, पाटील, पो. हवा. साठे, पो. कॉ. नारायण डमाळे, आप्पा तांबे, अमोल साळवे, अंबादास जाधव यांनी चोखपणे केला होता.
⭕15 जानेवारी 2025 रोजी सौंदळा येथे एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी झाली होती.
तिन्ही चोरींची फिर्याद स्वप्नाली बाबासाहेब आरगडे यांनी दिली होती.
परंतु तपासामध्ये सोने जे आहे ते पुष्पा चामुटे यांचे जप्त झालेले आहे, त्यामुळे सोने पुष्पा चामोटे यांना परत केले आहे.
स्वप्नाली आरगडेच्या सोन्याचा तपास चालू आहे.