अहिल्यादेवी होळकरांच्या स्मरणार्थ राज्यातील एकल महिला सर्वेक्षण करावे –
भेंडा – नगरशाही वृत्तसेवा
अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठक चौण्डी या त्यांच्या जन्मगावी उद्या ६ मे रोजी होत आहे. अहिल्यादेवी या कर्तृत्ववान एकल महिला होत्या त्यांच्या जयंती वर्षा निमित्त संपूर्ण राज्यातील सर्वच प्रकारच्या एकल महिलांचे सर्वेक्षण करुण त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य साऊ एकल महिला समितीने केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, अहिल्यानगर जिल्हा समन्वयक मिलिंदकुमार साळवे, अशोक कुटे, कारभारी गरड, प्रतिमा कुलकर्णी, संगीता मालकर, रेणुका चौधरी, उज्वला शेळके , शुभांगी गायकवाड, किसन आव्हाड, बाळासाहेब जपे, प्रकाश इथापे आदींनी म्हटले आहे की,अहिल्यादेवी एकल महिलांसाठी प्रेरणा व स्फूर्तीदायक आहेत. तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ एकल महिला पुनर्वसन धोरण राज्यातील एकल महिलांसाठी मैलाचा दगड ठरेल. महाराष्ट्रात विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांची संख्या खूप मोठी आहे. या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी, सरकारने धोरण आखण्यासाठी
एकल महिलांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.
* एकल महिला ८० लाख असू शकतात ?
अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान ज्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे,त्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेने दोन वर्षापूर्वी एकल महिला समितीच्या मागणीनुसार फक्त ग्रामपंचायत स्तरावर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. तेव्हा ग्रामपंचायत स्तरावर या एकल महिलांची संख्या
१ लाख ७ हजार होती. त्यात १५ तालुक्यातील नगर पंचायत,नागर परिषद, नगर पालिका, महानगर पालिका यांचे सर्वेक्षण केले तर ती संख्या २ लाख होऊन शकेल .एका जिल्ह्याची २ लाख तर एकूण ३६ जिल्ह्यात किती ? पुणे,मुंबई,नागपूर,संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरातील मोठी संख्या बघता एकूण संख्या ८० लाखापेक्षा जास्त असू शकते.
त्यामुळे एकल महिलांच्यासाठी धोरण तयार करण्यास शासनाने सुरुवात म्हणून राज्यात एकल महिलांचे सर्वेक्षण करून अहिल्यादेवी
यांच्या स्मरणार्थ भरीव कृती करावी.
* सर्वेक्षणास येणार नाही खर्च .
हे सर्वेक्षण करण्यासाठी फार खर्च ही येणार नाही. ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांच्याकडे गावातील एकल महिला माहिती असतेच. ती फक्त वयोगटानुसार संकलन करायची आहे. शहरी भागात प्रभाग अधिकारी ,अंगणवाडी व स्वयंसेवी संस्था मदत करू शकतील.
त्यामुळे या सर्वेक्षणासाठी खर्च होणार नाही . अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ एकल महिलांचे सर्वेक्षण होऊन त्यांच्यासाठी कृती कार्यक्रम करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे .