भेंडा येथे विधवा अनिष्ट प्रथेचे होळीत दहन
भेंडा – वृत्तसेवा
एकल ( विधवा ) महिलांसाठी कायमच अन्यायकाराक व अनिष्ट असणाऱ्या प्रथेचं होळी मध्ये दहन करून विधवांना यातुन मुक्त करण्यासाठी शपथ घेतल्याचे नेवासा तालुका साऊ एकल महिला समितीच्या उपाध्यक्षा रेणुका चौधरी यांनी सांगितले.
होळी सणाच्या दिवाशी दि.१३ रोजी सायंकाळी पारंपारिक होळी पेटवुन त्यात जुन्या रुढि परंपरा , अनिष्ट चालीरीती मोठ्या कागदावर लिहुन त्याचे होळीत दहन करण्यात आले. व शपथ घेण्यात आली. याप्रसंगी क्रांती भालेकर , संगीता नवले, उज्ज्वला सोनपुरे , सोनाली भालेराव , स्वाती फाळके, मुक्ता निकम , रेणुका चौधरी , लक्ष्मण आरगडे आदिंचा सहभाग होता.विधवांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी साऊ एकल महिला नेवासा तालुका समिती कार्यरत आहे.
विधवा महिलांना रूढी-परंपरांच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी समाजाने मानसिकता बदलणे गरजेचे आहे. विधवा म्हणजे केवळ दु:खाची मूर्ती नाही, तर ती एक स्वतंत्र, सक्षम आणि आपल्या हक्कांना जागणारी व्यक्ती आहे. तिच्या आयुष्यावर बंधने घालण्याऐवजी तिला शिक्षण, पुनर्विवाह, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाची संधी द्यायला हवी. समाजातील जुने, अन्यायकारक संकेत मोडण्याची जबाबदारी आपली आहे. विधवा महिलांवर असलेले अंधश्रद्धेचे ओझे दूर करून त्यांना सन्मानाने आणि आनंदाने जगण्याचा अधिकार द्यायला हवा.पतीच्या निधनात स्त्रीचा कुठलाच दोष नसतो .परंतु तीचे कुंकू पुसणे, जोडवे काढण्यापासून सुरुवात होते ते तिला धार्मिक किंवा कौटुंबिक लग्न समारंभात सहभागी केले जात नाही. तिला पांढऱ्या पायाची उपमा देऊन अपमानीत केले जाते. परंतु पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कुटुंब प्रमुख गेला म्हणून तिच्यावर येते. तिला समाजाने धीर देणं गरजेचं असतं. विधवा महिलेवर मुलांच्या शिक्षणाची, कुटुंब खर्चाची, वृद्ध सासू-सासर्यांच्या औषध उपचारांच्या खर्चाची जबाबदारी येते.
पती गेल्यानंतर पुनर्विवाहस परवानगी दिली तर कुटुंब पुन्हा व्यवस्थित होऊन जीवन आनंदी होऊ शकते. विधवा प्रथा बंद करून विधवांना धार्मिक व कौटुंबिक तसेच लग्न समारंभात सहभागी होण्याची परवानगी देऊन त्यांना कुंकू- टिकली, सौंदर्य प्रसादानाची दाग-दागिने, मंगळसूत्र घालण्यास सांगून विधवा पुनर्विवाहसाठी परवानगी पाहिजे .